जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Latur — Government of Maharashtra

30/08/2026 06:16

अंतिम जाहिरात २०२६ · अर्जदारांसाठी अधिकृत माहिती

अटी व शर्ती

अर्ज व केंद्र संचालनासाठी लागू अटी

महत्त्वाचे: सर्व अपलोड केलेली प्रमाणपत्रे व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित असावीत. अर्ज अंतिम सादर केल्यानंतर कोणतेही नवीन कागदपत्र स्वीकारले जाणार नाही.
०५

Conditions of application

अटी व शर्ती

  1. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबतचे १) शासन निर्णय क्र. मातंस-१७१६/प्र. क्र.५१७/३९ दिनांक १९ जानेवारी २०१८, २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक-आसेकें-१७२५/प्र.क्र. ८६/माते (३९) सामान्य प्रशासन विभाग दिनांक २७ मार्च २०२५, ३) इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग यांचा शासन निर्णय क्र. आसेकें-2026/प्र.क्र. 98/TECH-1 (E-1742666) दिनांक ०९ जुलै २०२६ या शासन निर्णयास अधीन राहून आपले सरकार सेवा केंद्राचे वाटप व केंद्र कार्यान्वित केले जाईल. तसेच वरील शासन निर्णयांमधील अटी व शर्तींचे पालन करणे अर्जदारास अनिवार्य राहील. त्याचा भंग केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र रद्द करण्यात येईल.
  2. अर्जदार हा गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सक्षम असावा. आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान ६ ते १२ महिने व्यवसाय चालविण्याची आर्थिक क्षमता असावी.
  3. अर्जदार हा स्थानिक रहिवासी असावा. (ग्रामपंचायत क्षेत्राकरिता संपूर्ण ग्रामपंचायत भौगोलिक घटक, नगर परिषद व नगरपंचायतीसाठी संपूर्ण नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्र भौगोलिक घटक तसेच महानगरपालिका क्षेत्रासाठी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल.)
  4. अर्जदाराकडे स्वतःचे किंवा भाड्याचे किमान १०० चौ.फुटाचे स्वतंत्र कार्यालय असावे.
  5. अर्जदारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
  6. शासन निर्णय दिनांक १९ जानेवारी २०१८ व दिनांक २७ मार्च २०२५ नुसार आपले सरकार सेवा केंद्राचे बॅनर तसेच केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे, शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर प्रसिद्ध करणे तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारणी न करणे बंधनकारक राहील.
  7. अर्जदाराकडे स्वतःचे किमान २ संगणक/लॅपटॉप, १ स्कॅनर, १ लेझर प्रिंटर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, यूपीएस अथवा पर्यायी वीज बॅकअप, ब्रॉडबँड व इंटरनेट (ग्रामीण भागात १० Mbps व नागरी भागात २० Mbps), सीसीटीव्ही, नागरिकांसाठी प्रतीक्षाकक्ष इत्यादी आपले सरकार सेवा केंद्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा असणे तसेच आपले सरकार सेवा केंद्राची आज्ञावली उत्तमरीत्या हाताळण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य असणे आवश्यक आहे.
  8. शासनाने पुरविलेल्या आज्ञावली इत्यादींचा योग्य वापर, संरक्षण व जतन करणे अर्जदारास बंधनकारक राहील.
  9. आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित ठिकाणीच चालविणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास, गंभीर स्वरूपाची चूक समजून केंद्र रद्द करण्यात येईल.
  10. एका उमेदवारास जिल्ह्यामध्ये (शहरी/ग्रामीण) कोणत्याही एकाच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल. दुबार अर्ज केल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
  11. यापूर्वी ज्यांचेकडे स्वतः किंवा कुटुंबात आधीपासून जिल्हा परिषद विभागाचे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपले सरकार सेवा केंद्र सुरू असेल त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. कुटुंबातील एकच व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यास पात्र राहील. (कुटुंब म्हणजे पती, पत्नी व अविवाहित मुले/मुली.)
  12. आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी दिलेली माहिती किंवा इतर आवश्यक माहिती अर्जामध्ये चुकीची/खोटी आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येऊन अपात्र ठरविण्यात येईल व निवड झाल्यानंतरसुद्धा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर निवड रद्द करण्यात येईल.
  13. अर्जदार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा. अर्जदाराने अर्ज करताना दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपविल्यास अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व निवड झाल्यानंतरसुद्धा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर निवड रद्द करण्यात येईल. यासंदर्भात पोलीस विभागाचा अभिप्राय अंतिम समजून निर्णय घेण्यात येईल.
  14. आपले सरकार सेवा केंद्रांना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे/निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच त्यांनी केंद्राबाबत मागितलेले अहवाल तात्काळ सादर करावे लागतील.
  15. अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाल्यानंतर सलग ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये एकही व्यवहार केला नसल्यास सदर केंद्र कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पुन्हा केंद्र चालू होणार नाही.
  16. केंद्रांमधून निर्गमित केलेल्या प्रमाणपत्र/दाखल्यांच्या स्थळप्रती संबंधित तहसील/उपविभागीय कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.
  17. शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सर्व सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून विहित शुल्कात देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास तसेच अभिप्राय कक्षाकडून केंद्रचालकाच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्यास चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.
  18. शासनाचे साहित्य प्राप्त झाल्यास त्याचा काटकसरीने वापर करून संरक्षण व जतन करावे लागेल. तसेच डिजिटल पेमेंटला प्राधान्य द्यावे लागेल.
  19. अर्जामध्ये भरलेली माहिती चुकीची आढळल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  20. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांनी नियुक्त केलेले तांत्रिक अधिकारी हे आपले सरकार सेवा केंद्राची संपूर्ण चौकशी करू शकतील.
  21. आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या-त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग यांचा शासन निर्णय क्र. आसेकें-2026/प्र.क्र. 98/TECH-1 (E-1742666) दिनांक ०९ जुलै २०२६ नुसार गुणांकन प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा सेतू समितीचा निर्णय अंतिम राहील.
  22. मा. जिल्हाधिकारी, लातूर यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना/निर्देश/आदेश यांचे पालन करणे बंधनकारक राहील.
  23. केंद्र व राज्य शासनाचे/निमशासकीय/सार्वजनिक उपक्रमे/महामंडळे/स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसेच शासकीय सेवांमध्ये कार्यरत असणारे अधिकारी/कर्मचारी यांना आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करता येणार नाही. (आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज प्रक्रियेत ग्रामपंचायतीमध्ये रुजू असलेले केंद्रचालक या प्रक्रियेसाठी अपात्र असतील.)
  24. ज्या केंद्रचालकांवर यापूर्वी लातूर जिल्हा/तालुका प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली असेल अशा केंद्रचालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, शेवटची एक संधी म्हणून या जाहिरातीमध्ये त्यांना अर्ज करता येईल व या जाहिरातीमधील सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील. मात्र ज्या केंद्रचालकावर प्रशासनामार्फत फौजदारी कार्यवाही प्रस्तावित आहे किंवा करण्यात आलेली आहे, त्यांचा विचार करण्यात येणार नाही.
  25. अंतिम पात्र झालेल्या उमेदवारांना सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्र १ महिन्यात सुरू करणे बंधनकारक राहील. (शासन नियमानुसार केंद्र स्थापन केल्याबाबत GPS Enabled फोटो सादर करणे बंधनकारक राहील.)
  26. आपले सरकार सेवा केंद्र वाटपाबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती, लातूर यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.
  27. अर्जदाराने आपले सरकार सेवा केंद्र वाटपासंदर्भात कोणत्याही प्रकारची शिफारस अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरविण्यात येईल.
  28. जाहिरात प्रसिद्ध करणे, स्थगित करणे, जाहिरातीमध्ये दुरुस्ती करणे, संपूर्ण प्रक्रिया रद्द करणे किंवा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करणे याबाबतचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती यांना राहतील.
  29. अर्जदारास कोणत्याही प्रक्रियेबाबत वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. लातूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांच्या जाहिरातीबाबत सर्व माहिती वेळोवेळी जिल्ह्याचे संकेतस्थळ https://latur.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता या कार्यालयाशी संपर्क साधण्याची आवश्यकता नाही.
  30. अर्जदारांना आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जाचे शुल्क रु. ५००/- प्रमाणे ऑनलाईन फॉर्म जमा करतेवेळी शुल्क स्वतःच्या बँक खात्याद्वारे QR Code द्वारे पेमेंट करून त्याची पावती/Receipt जोडणे अनिवार्य राहील.
  31. मुलाखतीवेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास संबंधितांचा अर्ज अपात्र करण्यात येईल.
सर्व मार्गदर्शिका नवीन अर्जदार नोंदणी रिक्त केंद्रांची यादी पहा